पिंपरी : कर्ज मंजुरीचे अधिकार नसताना, फिर्यादीच्या कागदपत्रांवर खोट्या सह्या, शिक्के मारून बँक कर्जदाराकडून ८८ हजार २०० रुपये उकळले. बनावट शिक्के वापरुन बँकेच्या नावलौकीकास बाधा निर्माण केली. याप्रकरणी कौशिक चटर्जी (रा.लोहगाव, पुणे) यांच्याविरूद्ध निगडी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन्सन घोन्सालो आल्मेडा (वय ४९, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद नोंदवली आहे. बिराजदार नामक व्यक्तीने फिर्यादीशी संपर्क साधून बँक गॅरंटीची गरज आहे,असे सांगितले. ‘‘माझे बँकेत खाते नाही. परंतु मित्राला परफॉर्मन्स बँक गॅरंटी पाहिजे. माझ्या मित्राच्या ओळखीच्या एकाला अशी बँक गॅरंटी आपल्या बँकेतुन मिळाली आहे. त्याची प्रत आपणास व्हॉटसअॅपवरून पाठवतो’’. असे त्याने सांगितले. एवढेच नव्हे तर व्हॉटसअॅपवर कागदपत्रही पाठवली. फिर्यादी जॉन्सन यांनी व्हॉटसअॅपवरील कागदपत्र पाहिली. ही कागदपत्र पाहिल्यानंतर सही चुकीची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सांगतो, असे त्यांना कळविले. बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे चौकशी केली असता, आरोपीने इतर बँकेच्या कर्जदारांचीसुद्धा फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले. बँकेत कर्ज मंजुरीचे अधिकार नसताना, कर्जदारांना आपणास कर्ज मंजुरीचे अधिकार आहेत, असे भासवुन आरोपीने कर्जदरांकडून पैसे उकळले असल्याची बाब निदर्शनास आली. बॅंकेचे बनावट शिक्के, मंजुरीचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून कर्जदारांकडून ८८ हजार २०० रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.