पिंपरी : दोघांना नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाख ९५ हजार रुपये घेतले. नोकरी न लावता त्यांचे पैसे परत केले नाहीत. भोसरी येथे २०१८ पासून १५ जानेवारी २०२० या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
संतोष सुयस सुतार (रा. शीतलबाग सोसायटी, भोसरी), ज्ञानेश्वर धनवडे (रा. खारघर, नवी मुंबई), विलास गोपाळ गमरे (रा. सिद्धार्थनगर, ठाणे), अशी आरोपींची नावे आहेत. विजय सदानंद शेळके (वय ४९, रा. आरडे, ता. कर्जत, जि. रायगड) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २८) फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगणमत करून फिर्यादीचा मुलगा संकेत विजय शेळके (वय २४) आणि फिर्यादी यांचा भाचा नीलेश पुंडलिक मोरे (वय २४, रा. मोईपाडा, ता. शहापूर, जि. ठाणे) यांना नोकरी लावतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शीतलबाग, भोसरी येथे फिर्यादी यांच्याकडून नऊ लाख रुपये रोख रक्कम स्वीकारली. त्यानंतर १२ लाख ९५ हजार रुपये बँक खात्यावरून आरोपींनी घेतले. एकूण २१ लाख ९५ हजार रुपये घेऊन फिर्यादीचा मुलगा आणि भाच्याला नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.