पिंपरी: ‘मी बजाज कंपनी आकुर्डी येथे मोठा ऑफिसर आहे. बजाज कंपनीमधून अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’, असे सांगून दोघांनी मिळून एकाची सात लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना एप्रिल २०२० ते १३ नोव्हेंबर २०२० या कालावधीत वैभवनगर सोसायटी, पिंपरी येथे घडली.
शंकरलाल लालचंद बखत्यारपुरी (वय ५०, रा. वैभवनगर सोसायटी, पिंपरी) यांनी याबाबत गुरुवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश जाधवाणी (वय २५), आकाश जाधवाणी (वय २१, दोघे रा. सुखवाणी केसल सोसायटी, पिंपरीगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शंकरलाल यांना, ‘मी बजाज कंपनी आकुर्डी येथे मोठा ऑफिसर म्हणून नोकरीस आहे. मी बजाज कंपनीमधून अर्ध्या किमती मध्ये तुम्हाला ३२ गाड्या काढून देतो’. असे सांगून वेळोवेळी सात लाख ६० हजार रुपये घेतले. पैसे घेऊन आरोपीने शंकरलाल यांना ३२ गाड्या दिल्या नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.