पिंपरी : दुचाकीला ठोकर मारल्याचा बहाणा करुन एका वाहनचालकाकडून साडेतीन हजार रुपये उकळून फसवणूक केली. हा प्रकार भोसरीतील ई प्रभाग कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली.
या प्रकरणी गोविंद पुरुषोत्तम नावरीकर (वय ४३, रा. सुंदर सृष्टी, सनसिटी रोड, आनंदनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नावरीकर हे शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास भोसरीतील ई प्रभाग कार्यालयासमोरुन जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन अनोळखी दोघेजण त्यांच्या वाहनाजवळ आले. तसेच ‘तुम्ही आमच्या गाडीला ठोकर मारली आहे, आम्ही डिपार्टमेंटचे लोक आहोत, तुम्ही गाडी चालविण्याचे लायसन्स दाखवा, नाहीतर दंड भरावा लागेल’ असे म्हणाले. त्यानंतर नावरीकर यांच्या पैशांच्या पाकीटातून ३ हजार ४०० रुपये घेवून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.