पिंपरी : एटीएम बसवण्याच्या मोबदल्यात ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून ७० ते ८० गुंतवणूकदारांकडून १० लाख रुपये घेत एटीएम न बसवता गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एका महिलेसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आदित्य शगुन मॉल, बावधन, पुणे येथे फेब्रुवारी २०२० पासून ते ४ सप्टेंबर २०२१ या कालावधीत फसवणुक झाली असल्याचे समोर आले आहे.
परमेश्वर दादाराव पाटील (वय ४५, रा. अहमदनगर) यांनी या प्रकरणी शनिवारी (दि. ४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मे. अन्नदाता मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर राजू भीमराव साळवे (वय ४१), त्याची पत्नी ज्योती राजू साळवे (वय ३४, दोघेही रा. वारजे माळवाडी, पुणे), मॅनेजर कुमार श्रीधर गोडसे (रा. बावधन बुद्रूक, पुणे) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू साळवे हा मे. अन्नदाता मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्ट असून, गोडसे हा कंपनीचा मॅनेजर आहे. राजू साळवे त्याची पत्नी ज्योती साळवे आणि गोडसे यांनी एटीएम बसून देण्याचे सांगून मोबदला म्हणून ज्यादा परताव्याचे आमिष दाखविले. त्यातून पाटील आणि इतर ७० ते ८० गुंतवणूकदारांकडून १० लाख रुपये अनामत रक्कम घेतली. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे ठेवलेल्या अनामत रकमेचा अपहार केला. तसेच एटीएम न बसवता सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक केली.