पिंपरी : वधू-वर सूचक मंडळाच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर बायोडेटा शेअर केल्यानंतर महिलेची एकासोबत ओळख झाली. त्याने आयफोन डिस्काउंटमध्ये देण्याचे सांगून महिलेची ५५ हजारांची फसवणूक केली. हिंजवडी परिसरात २४ ते ३० एप्रिल या कालावधीत ही घटना घडली.
वेदांतसिंग नवीनसिंग असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. फसवणूक झालेल्या महिलेने याप्रकरणी सोमवारी (दि. ४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने वधू-वर सूचक मंडळाच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर बायोडेटा शेअर केला होता. त्यावरून फिर्यादीची आरोपीसोबत ओळख झाली. मी ॲपल कंपनीत सेल्समन म्हणून कामाला आहे, असे सांगून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. ॲपल कंपनीचा आयफोन ५० टक्के डिस्काउंटमध्ये देतो, असे सांगून आरोपीने फिर्यादीकडून ५५ हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. पैसे घेऊन फोन न देता फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.