लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेतील स्थायी समितीने पाच टक्के पाणीपुरवठा दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. त्यात नागरिकांना सहा हजार लिटरपर्यंत पिण्याचे पाणी मोफत देण्याची योजना जाहीर केली. ही योजना फसवी आहे. फसवी योजना नागरिकांच्या माथी मारण्याचे कारस्थान सत्ताधारी भाजपा करीत आहे. दरमहा १०० रुपये पाणीपट्टी शुल्क प्रतिकुटुंब केलेले असताना, दरमहा सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत कसे, असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केला आहे.उन्हाळ्यापूर्वीच पाण्यावरून राजकारण पेटले आहे. बाबर यांनी महापौर नितीन काळजे यांना निवेदन दिले आहे. ‘‘सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत अशी घोषणा करीत असताना दरमहा प्रतिकुटुंब निश्चित केलेले शंभर रुपये पाणीपट्टीशुल्क सोयीस्कररीत्या लपविले हा भाजपाच्या पारदर्शक कारभाराचा नमुनाच आहे. भाजपाने ‘खोटे बोला पण रेटून बोला’ हे धोरण अवलंबले आहे. ४२५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून लक्ष वळविण्यासाठी सहा हजार लिटरपर्यंत मोफत पिण्याचे पाणी अशी घोषणा केली. सध्याच्या दरपत्रकाप्रमाणे एक ते ३० हजार लिटरपर्यंत प्रति २.५० रुपये प्रति एक हजार लिटर हा दर आहे. २० हजार २५० लिटर पाणी वापरल्यास, दरमहा येणारा पाणीपट्टीचा खर्च ५१.२५ रुपये येतो. हा सध्या प्रतिकुटुंब दरमहा शुल्क नाही. स्थायीचा प्रस्ताव फेटाळावा.’’
महापालिकेची मोफत पाणी योजना फसवी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 3:05 AM