तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात होणारा त्रास कमी करण्यासाठी तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या पुढाकाराने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुक्यातील ५५ गावांतील तब्बल ६०० विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. अशा प्रकारचा हा राज्यात राबविला गेलेला पहिलाच उपक्रम आहे.मावळ तालुका हा डोंगर-दऱ्या व धरणांनी व्यापलेला आहे. त्यामुळे अनेक गावे अजूनही दुर्गम आहेत. दळणवळणाची पुरेशी साधने नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी काही किलोमीटरची पायपीट करावी लागते. दहावीची परीक्षा केंद्रे तर वडगाव मावळ, कामशेत किंवा पवनानगर अशा मोठ्या गावांमध्ये असतात. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी दररोज कित्येक किलोमीटर प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. तालुक्याच्या टोकाला असलेली गावे तर परीक्षा केंद्रापासून तब्बल ४० किलोमीटर अंतरावर आहेत. परीक्षेच्या काळात दीड ते दोन तासाचा प्रवास म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खरोखरच दिव्य असते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बहुतांश पालकांकडे स्वत:ची वाहने नाहीत. विद्यार्थ्यांना एसटी बसवर विसंबून राहावे लागते. गावापासून मुख्य रस्त्यापर्यंत चालत यायचे आणि एसटी बसची वाट बघायची. बस आल्यानंतर शहरात जायचे. तेथून पायपीट करत परीक्षा केंद्रापर्यंत पोहायचे. ज्यांना शक्य असेल त्यांनी परीक्षा केंद्र असलेल्या गावातील मंदिर, समाज मंदिरात, वसतिगृहात किंवा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या घरी परीक्षेच्या काळापुरता आश्रय घ्यायचा, एवढाच पर्याय त्यांच्यापुढे होता.विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्याचा निर्णय तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी घेतला. त्यांच्या पुढाकारने स्थापन झालेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तालुका पिंजून काढला. त्यात ५५गावातील विद्यार्थ्यांना मोफत वाहनव्यवस्थेची गरज असल्याचे आढळून आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत आणि परीक्षा झाल्यानंतर परत घरापर्यंत सोडविण्याची जबाबदारीे प्रतिष्ठानने उचलली. त्यासाठी त्या-त्या परिसरातील ६० चारचाकी वाहने भाड्याने घेण्यात आली. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी परीक्षा .केंद्रावर पोहचविणे आणि सुरक्षितपणे परत घरी पोहचविण्यात येत असल्याने पालकवर्गही निश्चिंत झाला आहे. प्रवासात दररोज वाया जाणारे तीन ते चार तास वाचू लागल्याने विद्याथीर्ही खूष आहेत. त्यामुळे यावेळी मावळातील निकालाचा टक्काही वाढण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास
By admin | Published: March 20, 2017 4:17 AM