पिंपरी : मित्राच्या पत्नीसोबत असलेले अनैतिक संबंधातून मित्राचाच खून करून मृतदेह मुळशी धरणात टाकून दिला. ही घटना २४ सप्टेंबरला घडली. खून झालेल्या तरुणाचे नाव किशोर प्रल्हाद पवार (वय ३५) असे आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे यांनी मंगळवारी (दि.३) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित अक्षय भास्कर खिल्लारे (२१, रा.बालेवाडी, मुळगाव - आसेगाव, वसमत, जि.हिंगोली) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अक्षय याने किशोर याला मुळशीमध्ये एक अपघात झाला आहे. तेथे मदतीसाठी जाण्याच्या बहाण्याने आपल्या सोबत घेतले. दोघे जण दुचाकीवरून मुळशीतील वारक येथे गेले. धरणाजवळ संशयित अक्षय याने गाडी थांबवली. विळ्याने किशोरच्या मानेवर आणि चेहऱ्यावर वार करून त्याच्या खून केला. तसेच मृतदेह कपड्याने बाधून धरणात टाकून दिला.
किशोर बेपत्ता असल्याच बाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिचा तपास करताना किशोर हा संशयित अक्षय सोबत गेल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी अक्षय ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावली.