पिंपरी : एकाला मारण्याबाबत कट रचण्यासाठी अल्पवयीन मित्र एकत्र जमले. त्यावेळी दारू पिऊन नाचगाणे सुरू असताना एका मित्राने त्याच्या १५ वर्षीय मित्राकडे सिगारेट मागितली. मात्र, त्याने सिगारेट दिली नाही. या कारणावरून राग आल्याने मित्रांनी कोयत्याने वार करत निर्घृणपणे १५ वर्षीय मित्राचा खून केला. ही घटना सोमवारी (दि. ४) दुपारी जुना जकात नाका, मोशी येथे घडली.
सुमित सतीश बनसोडे (वय १५, रा. बनकरवस्ती, मोशी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच मुलांना ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित याच्या एका मित्राची कबुतरांची ढाबळ आहे. त्या ढाबळीत डुडुळगाव येथील त्यांचा एकजण येऊन गेला असल्याचा संशय सुमित आणि त्याच्या मित्रांना होता. ज्याच्यावर संशय होता त्याच्याकडे देखील कबुतरांची ढाबळ होती. संशयावरून त्याला मारण्यासाठी सुमितच्या मित्राने त्याला इन्स्टाग्रामवरून मेसेज करून बोलावून घेतले. तो आल्यानंतर त्याला मारण्याचा कट सुमित याच्या मित्राने केला. त्यासाठी त्याने सोमवारी सकाळपासून सुमित आणि इतरांना एकत्र आणण्यास सुरुवात केली. अकराच्या सुमारास सुमित याच्यासह पाच ते सात मित्र एकत्र आले. ते मोशी येथील जुना जकात नाक्याजवळ असलेल्या जंगलात गेले.
दरम्यान, ते सर्वजण दारू पिऊन मोबाईलवर गाणी वाजवून नाचू लागले. सुमितकडे सिगारेट होती. त्याच्या एका मित्राने सुमित याच्याकडे सिगारेट मागितली. मात्र सुमितने सिगारेट दिली नाही. या कारणावरून दोन मित्रांनी सुमितच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यात जखमी झालेल्या सुमितचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्वजण घटनास्थळावरून निघून गेले.
बेपत्ता झाल्याची केली होती नोंद
सुमितची आई एका स्कुलबसवर अटेंडंट म्हणून कामाला आहे. ती सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घरी आली. सुमित घरी आला नसल्याने त्याच्या आईने शोधाशोध केली. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सुमितची आई एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आली. पोलिसांनी सुमितच्या बेपत्ता होण्याबाबत तक्रार नोंदवून घेतली.
मित्रामुळेच पोलीस पोहचले घटनास्थळी
सुमितचा खून झाला त्यावेळी तिथे असणारा एक मित्र खुनाच्या घटनेनंतर सोमवारी दिवसभर सुमितच्या आईसोबत सुमितला शोधत फिरत होता. मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याने पोलिसांना सुमित जुना जकात नाक्याजवळ एका झाडाखाली झोपला असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे सुमितचा मृतदेह मिळून आला. सुमितच्या त्या मित्रावरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी मिळून सुमित याचा खून केल्याचे सांगितले.
शाळेच्या दप्तरात कोयते, खंजीर
या प्रकरणात ताब्यात घेतलेली दोन मुले शाळेत जातो असे सांगून दप्तर घेऊन घरातून बाहेर पडली होती. बाहेर आल्यानंतर त्यांनी दप्तरात कोयते, खंजीर घेतले. तसेच सुमित याने सिगारेट आणि दारू घेतली. त्यानंतर ते जुना जकात नाका येथील जंगलात पोहचले. तेथे दारू पिऊन नाचगाणे केले.