पिंपरी : तरुणीची बंबल या डेटिंग ॲपवरून एका तरुणासोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने तरुणीला मालदीवच्या ट्रिपची ऑफर दिली. तिच्या घरी येऊन गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच ५० हजार रुपये घेऊन गेला. ट्रिपची तारीख उलटून गेल्यावर आपली फसवणूक आणि विनयभंग झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. रहाटणी येथे ११ ते २६ मार्च या कालावधीत हा प्रकार घडला.
मॅडी सूर्या नावाचे युजर नेम असेलेला मुकेश सूर्यवंशी (रा. कल्याणीनगर, पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीडित तरुणीने रविवारी (दि. ८) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बंबल या डेटिंग ॲपवरून फिर्यादीशी जवळीक साधली. इंस्टाग्राम मेसेज आणि फोनद्वारे संपर्क साधून आरोपी हा फिर्यादीच्या घरी आला. मालदीवच्या ट्रिपकरिता आरोपीने फिर्यादीला ऑफर केली. त्यानंतर मुकेश हा फिर्यादी तरुणीच्या घरी आला.
तेथे गैरवर्तन करत तरुणीचा विनयभंग केला आणि शरीरसुखाची मागणी केली. तसेच आरोपी हा २१ मार्चला फिर्यादीच्या घरी आला. तिचा विश्वास संपादन करून पासपोर्टची झेरॉक्स आणि ५० हजार रुपये नेले. त्यानंतर २६ मार्च पर्यंत त्याने फिर्यादीसोबत वारंवार संपर्क केला. ट्रीपची तारीख उलटून गेल्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आले की, आरोपीने त्यांना मालदीवच्या ट्रिपबाबत खोटे सांगून आपल्याकडून ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.