पिंपरी : वाकड परिसरात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून दोन चोरट्यांना अटक केली. हे चोरटे सख्ख्ये भाऊ असून, गुजरात राज्यातून ते १६ गुन्ह्यांमध्ये फरार आहेत. तर, त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत केलेले १६ गुन्हे उघड झाले आहेत. अटक केलेल्या आरोपींचे नाव सतपालसिंग क्रिपालसिंग सरदार (वय २६), लखनसिंग क्रिपालसिंग सरदार (वय २८, दोघे रा. घासकौर दरवाजा, वडनगर, गुजरात) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस ठाण्यात घरफोडी करून सहा लाख २८ हजार ५०० रुपये किमतीचे साने, चांदीचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा १७ फेब्रुवारीला वाकड पोलिस ठाण्यात दाखल केला होता. या चोरीच्या अनुषंगाने पोलिस आरोपीचा शोध घेत होते. त्यात अनेक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. तपासादरम्यान पोलिस भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, प्रमोद कदम यांनी विश्वासू बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वाकडमध्ये चोरी करणारे दोन चोरटे रावेत परिसरात येणार आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळालेल्या वर्णनाप्रमाणे आरोपी दुचाकीवरून तेथे आले असता, पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली. अटक केलेल्या आरोपींनी आपली नावे सतपालसिंग सरदार, लखनसिंग सरदार अशी सांगितली. पोलिसांना त्यांच्याकडील बॅगमध्ये लोखंडी कटावणी, स्क्रूड्रायव्हर, पोपट पान्हा असे साहित्य मिळून आले. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, सोमवार (दि. १३) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गुजरातमध्ये घरफोडी
आरोपींवर गुजरात राज्यात घरफोडी, चोरीचे १६ गुन्हे दाखल असून, ते या गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुजरात पोलिस विशेष करून म्हैसाना व पाटण एलसीबी त्यांचा शोध घेत आहेत.
२४ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडे पोलिसांनी तपास केला असता, त्यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील घरफोडी चोरीचे एकूण १५ गुन्हे आणि एक वाहन चोरीचा गुन्हा अशा १६ गुन्ह्यांची कबुली दिली. दोन्ही आरोपींकडून एकूण २४ लाख ६८ हजार ४०० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच गुन्हा करताना वापरण्यासाठी चोरी केलेली मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.