पिंपरी - शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ५७ कोटी रुपयांच्या निधीचा दुसरा हप्ता मंजूर झाला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारकडून ३२ कोटी, राज्य सरकारचा १६ कोटी व प्रशासकीय कार्यालयीन खर्चासाठी ९ कोटीचा निधीचा समावेश आहे. आतापर्यंत स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५७ कोटींचा निधी मिळाला असून, त्याअंतर्गत शहरात पॅन सिटी प्रकल्पा अंतर्गत ‘फायबर टू होम’ व ‘स्मार्ट इलिमेंट्स’ उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेची केंद्र सरकारच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी या अभियानात दुसºया टप्प्यात निवड झाली. ही निवड स्पर्धात्मक पद्धतीने झाली आहे. केंद्र सरकारने स्मार्ट सिटीच्या प्रकल्पासाठी पाच वर्षांत ५०० कोटी, राज्य सरकारकडून २५० कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. या अभियानांतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात २७ कोटी रुपयांचा निधी दिला होता.पॅन सिटी प्रकल्पांतर्गत सुमारे ६५० कोटींची निविदा काढण्यात येत आहेत. त्यानुसार शहरात शहराच्या विविध भागांत फायबर केबलद्वारे इंटरनेटचे जाळे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ठिकाणी खड्डे (डक) घेण्यात येणार आहेत.भविष्यात नवीन वाहिनी अथवा केबल टाकताना हे डक भाड्याने देऊन महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे. या फायबरच्या केबल रस्त्याच्या बाजूला उभारण्यात येणाºया खांबाशी सलग्न ठेवणार आहेत. त्यातून वायफायची सुविधा शहरात विविध ठिकाणी उपलब्ध करणे सोपे होईल. साधारण ७५० किलोमीटर लांबीचे फायबर नेटवर्क उभारण्यात येणार आहे. याशिवाय नागरी सेवांसाठी किआॅस सेंटरमधून माहितीची सुविधा देण्यात येणार आहे. प्रमुख चौक व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीचे जाळे उभारणार आहे. त्याचा उपयोग पालिका प्रशासनासह वाहतूक पोलीस व गुन्हेगारी नियंत्रणासाठी होईल, असे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
पॅन सिटी प्रकल्पातून ‘फायबर टू होम’, केंद्राकडून निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 3:49 AM