पिंपरी : राज्यात दुष्काळ परिस्थिती असताना थंड हवेच्या ठिकाणी दौऱ्यावर जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून करदात्यांच्या पैशांची लूट सुरू आहे, अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांवर मौजमजा केली जात आहे, महापालिकेला जास्त पैसा झाला असेल, तर दौऱ्यावर न उधळता दुष्काळग्रस्तांना द्या, अशा संतप्त प्रतिक्रिया विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. तसेच या दौऱ्याचा निषेधही केला. राज्यभरात दुष्काळी परिस्थिती असून, दुष्काळामुळे नागरिक हैराण आहेत. अशातच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांसह १४ जण सिक्कीम दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावर साडेआठ लाखांचा खर्च होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत करदात्यांच्या पैशांवर पदाधिकारी दौऱ्यावर गेल्याबाबत ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘त्यांना नाही दुष्काळाचे भान’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले. हे वृत्त प्रसिद्ध होताच विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. भाजपा गटनेत्या वर्षा मडिगेरी म्हणाल्या, ‘‘पदाधिकाऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यांचा महापालिकेच्या कोणत्या प्रकल्पाला फायदा झाला, दौऱ्यांमधून आपण काय घेतले हे संबंधित पदाधिकाऱ्यांनी दाखवून द्यावे. केवळ सामान्य नागरिकांच्या पैशांवर मजा करण्याचा हा प्रकार आहे. महापालिकेकडे जास्त पैसे झाले असतील, तर तो पैसा दुष्काळग्रस्तांना द्यावा अथवा एखादे गाव दत्तक घ्यावे. मात्र, पैशांची उधळपट्टी होऊ नये.’’ (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांचे अभ्यास दौरे म्हणजे केवळ हौस मौज पूर्ण करण्यासाठीचा दौरा असतो. आतापर्यंत केलेल्या दौऱ्यांतून काय साध्य झाले हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यापूर्वी झालेल्या काही दौऱ्यामध्ये काहीही साध्य झाले नाही. यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली करदात्यांची पैशांची लूट होऊ नये. दौरे करण्याची जास्तच हौस असेल, तर स्वर्खाने जावे. विविध स्तरांतून टीका होत असतानाही निर्लज्जपणासारखे पुन्हा दौरे आयोजित केले जातात. - मारुती भापकर, कार्यकारिणी सदस्य, स्वराज अभियान.
निधी दुष्काळग्रस्तांना द्या
By admin | Published: May 10, 2016 12:36 AM