पिंपरी : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीचा टप्पा महत्त्वाचा असतो. त्यातही पुरुष उमेदवारांना छाती पाच सेंटीमीटर फुगवता येणे आवश्यक आहे. अन्यथा भरती प्रक्रियेतून बाद व्हावे लागते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत भरती होण्यासाठी १४ हजार भावी पोलिसांकडून जोरदार कसरत सुरू आहे.
राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत २१६ जागांसाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून जानेवारीअखेर मैदानी होणार आहे. त्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मोठी तयारी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहर, मावळ, मुळशी तसेच खेड तालुक्यातील स्थानिक उमेदवारांसह राज्यभरातून अर्ज केलेल्या १३ हजार ९१६ उमेदवारांकडून मैदानी चाचणीची तयारी सुरू आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांकडून पहाटेपासून व्यायामाला सुरुवात होत आहे. यात छाती फुगवणे, धावणे, गोळाफेक याचाही सराव केला जात आहे.
एका जागेसाठी १० उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी होणार निवड
मैदानी चाचणीमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. एका जागेच्या लेखी परीक्षेसाठी या गुणवत्ता यादीतील पहिल्या १० जणांची निवड होते. त्यात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत २१६ जागांच्या लेखी परीक्षेसाठी २ हजार १६० उमेदवारांची निवड होईल.
''पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या हजारो जणांकडून तयारी सुरू आहे. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असल्याने भरती पूर्व प्रशिक्षणात त्यांनी झोकून दिले आहे. - शंकर हुरसाळे, प्रशिक्षक, तळेगाव दाभाडे''