पिंपरी : उद्योगनगरीच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाबरोबर अवैध धंदे व गुन्हेगारीचा आलेखही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील नामांकित शाळा, महाविद्यालये व आयटी कंपन्यातील तरुण पिढी आकर्षणापोटी व सहज उपलब्धतेमुळे हुक्क्याच्या धुरात आपले भविष्य हरवत चालली आहेत. राज्यात बंदी घालण्यात आलेले हुक्का पार्लर पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम सुरू आहेत. देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी हुक्क्याच्या जाळ्यात अडकत चालली आहे. सोशल मीडियावर आयुर्वेदिक पदार्थ म्हणून हुक्क्याच्या जाहिराती बिनबोभाटपणे सुरू आहेत. मात्र, हप्तेगिरीमुळे या सर्व प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे सुरू आहे. तंबाखूजन्य पदार्थात मोडणाऱ्या हुक्का प्रकारावर राज्य शासनाने २०१८ पासून बंदी घातली आहे. हुक्क्याच्या नशेला आहारी जाणारी युवा पिढीची संख्यावाढत आहे. आयटी कंपन्यांमुळे महाराष्ट्रातील व परराज्यांतील तरुणांची मोठी संख्या उद्योगनगरीत वास्तव्यास आहे. या तरुणांना गिऱ्हाईक म्हणून हुक्क्यासाठी टार्गेट केले जात आहे. शहरातील अकरा ठिकाणी हुक्का पार्लर बिनबोभाटपणे सुरू आहेत. आयुर्वेदिक कंपन्यांच्या नावाने हुक्का सुरू असणारा हा गोरखधंदा तेजीत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना संपर्क केला जात आहे. आकर्षक जाहिरातबाजी करून तरुणांना विविध व्यसने व नशेच्या आहारी ओढले जात आहे. यातील काही पार्लरमध्ये अवैधरित्या मद्यविक्री केली जात आहे. शहरातील महाविद्यालयीनविद्यार्थी व आयटी क्षेत्रात काम करणारी युवा पिढी हुक्का पार्लरमध्ये रात्रभर झिंगत पडलेले असतात. रंगीबेरंगी आणि संगीताच्या तालावर ठेका धरणारी ही तरुणाई व्यसनाच्या आधीन झाल्याने त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. यामुळेही गंभीर सामाजिक समस्या बनत आहे. अशा हुक्का पार्लरमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. त्याचे गंभीर परिणाम पुढील पिढ्यांना सोसावे लागणार आहेत.................हिंजवडी, रावेतमध्ये सर्वाधिक पार्लरशहरातील जास्तीत जास्त हुक्का पार्लर हिंजवडी व रावेत या भागात आहेत. हॉटेल व मॉलमध्येही हुक्का पार्लर सुरू करण्यात आली आहेत. येथे हुक्क्याच्या विविध प्रकार ग्राहकांना पुरविले जात आहेत. उच्चभ्रू राहणीमान असलेले अनेक आयटीयन्स व विद्यार्थी हुक्का पार्लरच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र आहे.
हुक्क्याच्या धुरात हरवतेय पिंपरी शहरातील तरुणांचे भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 2:09 PM
राज्यात बंदी घालण्यात आलेले हुक्का पार्लर पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम सुरू
ठळक मुद्देमहाविद्यालय व आयटी कंपन्या टार्गेट.. हप्तेगिरीमुळे या सर्व प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे सुरू आयुर्वेदिक कंपन्यांच्या नावाने हुक्का सुरू असणारा हा गोरखधंदा तेजीत सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना संपर्क शहरातील अकरा ठिकाणी हुक्का पार्लर बिनबोभाटपणे सुरू