सांगवी : सांगवी परिसरात उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. अशा बेकायदा व्यवसायातून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. ग्राहकांच्या आरोग्यास बाधा पोहचू नये म्हणून कोणत्याही प्रकारची खबरदारी काही विक्रेत्यांकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.सांगवी परिसरात जवळपास सर्वच ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांसह काही मोठी हॉटेलही स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. सांगवी परिसरात शंभर ते दीडशे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. खाद्यपदार्थ विक्री करताना पुरेशी काळजी घेण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. खाद्यपदार्थ झाकून ठेवणे, जाळी ठेवणे, पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवणे इत्यादी बाबतीत विक्रेते दुर्लक्ष करताना दिसून येतात. सांगवीतील काटेपुरम चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, साई चौक, कृष्णा चौक आदी भागांत सकाळी आणि सायंकाळी खाद्यपदार्थ विक्रेते व ग्राहकांची गर्दी असते. याच भागात हॉटेल्सही आहेत. हातगाडीवाले रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करताना दिसून येत आहेत. यातील काही व्यावसायिकच स्वच्छता पाळत असल्याचे दिसून येते. खाद्यपदार्थ झाकून ठेवतात. सांगवी परिसरातील ८० टक्के खाद्यपदार्थ स्वच्छतेची व बनवण्यासाठी विक्रेते दुर्लक्ष करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे चित्र आहे.सांगवी आणि परिसरातील अनेक खाद्यपदार्थ विक्रेते आणि हातगाडीवाले हात स्वच्छ न धुता खाद्यपदार्थांची हाताळणी करतात. बहुतांश व्यावसायिक चायनीज खाद्यपदार्थांसाठी स्वच्छ भांडी किंवा दर्जेदार साहित्य वापरत नाहीत, असे दिसून येत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. शासन आदेश असतानाही हातगाडी आणि हॉटेलमध्ये पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवले जात नसल्याचे दिसून येते.अनेक ठिकाणी प्लॅस्टिक कॅन तर काही ठिकाणी जुने प्लॅस्टिक ड्रममधूनच ग्राहकांसाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. चहा विक्रेते कप धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करीत नाहीत.महापालिका आणि अन्न औषध प्रशासन विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. ग्राहकांच्या आरोग्यास बाधा होईल अशा पद्धतीने खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहकआणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढले आजारसांगवीतील साई चौकात संध्याकाळी अनेक हातगाडीवाले वडापाव तसेच चायनीज इत्यादी खाद्यपदार्थांची विक्री करतात. मात्र येथील खाद्यपदार्थ देताना प्राथमिक स्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन होताना दिसून येते. मात्र प्रशासन या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येते. महापालिका प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या यंत्रणांकडून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न सामान्य ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीतून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:42 AM