पिंपरी : मध्यरात्री जुगार अड्डा चालवून तीन पत्ती खेळणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा लाख आठ हजार २८० रुपयांची रोकड, एक लाख तीन हजार ५०० रुपयांचे मोबाईल फोन, सात वाहने व जुगाराचे साहित्य असा एकूण ३० लाख २४ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने शनिवारी (दि. १६) ही कारवाई केली.
संतोष बाळू केदारी (वय ३८, रा. कुसगाव ता. मावळ), असे जुगार अड्डा चालक व मालकाचे नाव आहे. त्याच्यासह इतर १० जणांविरोधात शिरगाव परंदवडी पोलीस चाैकी येथे शनिवारी (दि. १६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी केदारी हा कासारसाई ते पाचानी गावाला जाणाऱ्या रस्त्यावर कुसगाव (ता. मावळ) येथे एन्जाॅय पाॅईंट हाॅटेल येथील मोकळ्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री बारानंतर छापा मारला. रात्री साडेबाराच्या सुमारास केलेल्या या कारवाईवेळी आरोपी तीन पत्ती जुगार खेळताना मिळून आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सहा लाख आठ हजार २८० रुपयांची रोकड, एक लाख तीन हजार ५०० रुपयांचे मोबाईल फोन, २३ लाख १३ हजार रुपयांची सात वाहने, तसेच ११० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण ३० लाख २४ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक नीलेश वाघमारे, डाॅ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहायक फाैजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी संदीप गवारी, अनंत यादव, भगवंता मुळे, दीपक साबळे, महेश बारकुले, अनिल महाजन, गणेश कारोटे, अमोल शिंदे, वैष्णवी गावडे, सोनाली माने, योगिनी कचरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.