तृतीयपंथीयांना आरतीचा मान, घारजाई माता फळभाजी मंडई संघटनेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:44 AM2018-09-23T01:44:01+5:302018-09-23T01:44:19+5:30
रुपीनगर येथील श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटना व भाऊसाहेब काळोखे युवा मंचतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ‘मार्केटचा राजा’ गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते करण्यात आली.
तळवडे - रुपीनगर येथील श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटना व भाऊसाहेब काळोखे युवा मंचतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ‘मार्केटचा राजा’ गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते करण्यात आली. त्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. यामुळे तृतीयपंथी आनंदाने भारावले होते.
या वेळी नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, रवींद्र सोनवणे, स्वप्निल काळे, हेमंत नेटके, अक्षय तांबे, बाळासाहेब बनसोडे, विजय मळेकर, गणेश वाघमारे, भागवत भोई, अविनाश डोंगरे, वैभव सकपाळव तृतीयपंथी अमित म्हस्के, दीक्षा म्हस्के, वरविना म्हस्के आदी उपस्थित होते.
तृतियपंथीयांनाही मन, भावना, विचार आहेत, त्यांना समाजात समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, कोणताही भेदभाव न करता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून विकासाची समान संधी मिळावी म्हणून आम्ही गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते घ्यावी, असा मंडळात प्रस्ताव मांडला. त्याला सर्व सभासदांनी संमती दर्शविली, असे मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब काळोखे यांनी सांगितले.
तृतीयपंथी अमित म्हस्के यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आरतीचा मान दिल्यामुळे मनस्वी आनंद झाला असून, आम्हाला आई- बाप आहेत, पण कोणाचा आधार नाही. या उपक्रमाद्वारे आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी द्यावी. आमच्याकडे चांगल्या नजरेने बघावे. भावना समजून घ्याव्यात, असे आवाहन केले.
रवींद्र सोनवणे म्हणाले, तृतीयपंथीयांना आरतीचा मान देऊन एक स्तुत्य पायंडा सुरू केला आहे. त्याचा आदर्श घेऊन विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी अशा दुर्लक्षित घटकांना समाजाच्या प्रवाहात आणावे.’’
असा उपक्रम राबविणारे परिसरातील एकमेव गणेश मंडळ असून, त्यामुळे समाजात एकोप्याची भावना निर्माण होईल़