लोणावळा, दि. 6 - लोणावळा शहरात मंगळवारी तब्बल नऊ तास गणपती विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगला. ही मिरवणुक पाहण्यासाठी लोणावळा व मावळ पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी सव्वाचार वाजता मानाचा पहिला रायवुड गणेश मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणूकीसाठी मार्गस्त होऊन पाच वाजता मावळा पुतळा चौकात दाखल झाला. तदनंतर मानाचे पहिले पाचही गणपती याठिकाणे रांगेत येऊन मिरवणुकीला सुरुवात झाली, रात्री दिड वाजता सर्व बाप्पांचे विसर्जन पार पडले. अतिशय उत्साहपुर्ण वातावरणात व निर्विघ्नपणे ही मिरवणूक पार पडली. विशेष म्हणजे या मिरवणूकीत सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या व न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करत पारंपारिक वाद्यांचा गजर करत डीजे मुक्त मिरवणूक पार पाडली. पावसाने चांगली उघडीप दिल्याने परिसरातील नागरिकांनी विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत, ढोल, ताशे, लेझिम, बँन्जो आदीं पारंपारिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक सुरु होती. बहुतांश मंडळांचे महिलांचे ढोल पथक मिरवणुकीतील आकर्षण ठरत होते. आठ वाजता मानाचे गणपती जयचंद चौकात व नऊ वाजता शिवाजी चौकात दाखल झाले. मावळा चौक, जयचंद चौक, शिवाजी चौक व विजया बँकेसमोरील चौकांमध्ये गणेश मंडळांसमोरील ढोल ताशे पथकांचे खेळ सादर केले. हे खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. रात्री दहा वाजता मानाचा पहिला रायवुड गणेश मंडळाचा गणपती विसर्जन घाटावर दाखल झाला. त्याठिकाणी आरती करत बाप्पांची मुर्ती लोणावळा धरणात विसर्जनासाठी नेहण्यात आली. मानाचा दुसरा तरुण मराठा मित्र मंडळाचा गणपती साडेदहा वाजता विसर्जित करण्यात आला. यावेळी शेवटचा गणपती मावळा पुतळा चौकातून मार्गस्त होत होता. दिड वाजण्याच्या सुमारास बाप्पांना अखेरचा निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत आलेल्या नागरिकांना शिवसेनेच्या वतीने मसाले भात, रामदेवबाबा भक्त मंडळाने भेळ, लायन्स क्लब व सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्टने चहा व बिस्किट वाटप केले. शिवाजी चौकात लोणावळा नगरपरिषद, पोलीस स्टेशन, काॅग्रेस आय, राष्ट्रवादी काॅग्रेस, भाजपा, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमान संघटना, सुन्नी मुस्लिम समाज, लोणावळा युथ फाऊंडेशन यांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले होते.
चोख बंदोबस्त व नियोजन
विसर्जन मिरवणूक शांततेमध्ये व निर्विघ्नपणे पार पडावी याकरिता लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात होते. मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे, मुख्याधिकारी सचिन पवार व नगरपरिषदेचा अधिकारी वर्ग यांनी विसर्जन मार्गाची पाहणी करत मंडळांना व स्वागत कक्षांना भेटी दिल्या. विसर्जन घाटावर खास आपत्कालिन पथक म्हणून शिवदुर्ग मित्र या संस्थेचे स्वंयसेवक नेमण्यात आले होते