पिंपरी : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. उत्सवाचे नियोजन करण्यासाठी मंडळांच्या बैठका सुरू झाल्या असून कार्यकर्त्यांना कामाचे वाटप केले जात आहे.सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असलेला उत्सव म्हणजे, गणेशोत्सव. या उत्सवाची सार्वजनिक मंडळांकडून तयारी सुरू असून हा उत्सव अधिकाधिक नियोजनबद्धरित्या पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. मंडप कसा असावा, परवानगी घेणे, साउंड सिस्टिम यांसह देखावा कोणता सादर करायचा अन्कसा असावा यासाठीचे नियोजन केले जात आहे. उत्सवासाठी आवश्यक असलेली वर्गणी जमा करण्यासाठी यंदा मंडळांना चांगलीच पायपीट करावी लागणार आहे. वर्गणीच्या अंदाजानुसार मंडळांनी देखावा, विद्युत रोषणाई आणि वाद्यवृंदाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. कारण अवघ्या एक महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. वेळेवर मंडप मिळण्यास कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मंडप आगाऊ पैसे देऊन बुक करण्यात येत आहे. तसेच ‘श्रीं’ची आकर्षक मूर्ती बघण्यासाठी मूर्तिकाराकडे जाऊन त्याचेही बुकिंग करण्यास सुरुवात झाली आहे.तसेच मंडळांच्या बैठका होऊन नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन प्रत्येकास काही तरी जबाबदारी देण्यात येत आहे. त्यानुसार कामकाज सुरू केले आहेत.
गणेश मंडळांच्या बैठका सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:15 AM