पिंपरी :
गणेशोत्सव जल्लोषाचा तसाच जातीय सलोख्याचे दर्शन घडविणाराही उत्सव आहे. काेरोनाच्या काळात जात-धर्म आदीचा विचार न करता गरजूंना मदतीचा हात देण्यात आला. यातून महामारीत माणुसकीचे दर्शन घडले. त्याचीच प्रचिती गणेशोत्सवात येत आहे. दहा दिवसांत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीतील गणेशभक्तांचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात येणार आहे. यातून जातीय सलोख्याने दर्शन होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात काही भागातील मंडळांकडून पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. चिंचवड आणि पिंपरी येथे दहाव्या दिवशी विसर्जन केले जाते. चिंचवड आणि पिंपरी येथे विसर्जनाची मुख्य मिरवणूक असते. या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांचे स्वागत आणि गणेशभक्तांना पाणी, अन्नदान केले जाते. यंदा असे स्वागत मुस्लिम बांधवांकडून होणार आहे.
...येथे होणार स्वागतचिंचवड येथील मोहननगर, दत्तनगर, विद्यानगर, मोहननगर, चिंचवड गावातील गांधी पेठ येथील मशिद तसेच पिंपरी येथील नेहरुनगर, मिलिंदनगर, मोरवाडी, खराळवाडी व काळेवाडी फाटा येथील मशिदींतर्फे गणेशभक्तांच्या स्वागताचे नियाेजन केले आहे. शहरात शुक्रवारी दुपारनंतर मिरवणूक मार्गावर स्वागत होणार आहे.
सरबतासह श्रीफळगणेशमंडळांचे स्वागत करताना गुलाबपुष्प, पाण्याच्या बाटल्या, सरबत देण्यात येणार आहे. मंडळाच्या अध्यक्षांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानिक केले जाणार आहे. पिंपरी कॅम्प येथे रिव्हर रोड येथे काही संस्था, संघटनांकडून तसेच मंडळांकडून अन्नदान करण्यात येणार आहे.
भाईचारा म्हणून पाणी वाटप आणि गुलाबपुष्प देण्यात येणार आहे. दोन धर्मांमध्ये एकता असल्याचे यातून दिसून येईल. जातीय सलोखा राखण्याची आपली परंपरा आहे. तीच आपण याहीपुढे राखणार आहोत. त्याचाच हा एक प्रयत्न आहे. - मुनाफ तराजगार, तवकल्ला जामा मशिद, नेहरुनगरआजच्या घडीला एकतेचे दर्शन घडणे महत्त्वपूर्ण आहे. यात पोलिसांचाही सकारात्मक प्रतसाद मिळाला. त्यामुळे मंडळ आणि गणेशभक्तांचे स्वागत करण्याच्या उपक्रमाला चालना मिळत आहे. - गुलजार शेख, मक्का मशीद काळेवाडी फाटा, थेरगाव
उत्सव साजरा करताना जल्लोष केला जातो. शांततेत निर्विघ्नपणे उत्सव झाला पाहिजे. त्यासाठी जातीय सलोखा आवश्यक आहे. शांतता समितीच्या बैठकांमधून त्यासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी गणेश मंडळ आणि गणेशभक्तांचे स्वागत करण्यात येणार आहे. नागरिकांनी शांतता राखत सहकार्य करावे.- मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त