- नारायण बडगुजर
पिंपरी : कोरोना महामारीनंतर प्रथमच यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नियोजन, उत्साह, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन केले आहे. उत्सवादरम्यान निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ‘ड्रोन’चा वापरावर भर देण्यात येणार आहे. यातून ‘क्राऊड मॅनेजमेंट’ करण्यात येणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सव जल्लोषात साजरा होणार असल्याने पोलिसांकडूनही तयारी सुरू आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे बाहेरून अतिरिक्त कुमक मागविण्यात येणार आहे. त्याच्या जोडीला तांत्रिक बाबींवर पोलिसांनी यावर्षी अधिक भर दिला आहे. महापालिकेच्या माध्यमातून मिरवणूक मार्गांवर तसेच गर्दीच्या ठिकाणी तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. गर्दीवर निगराणी ठेवण्यासाठी ‘ड्रोन’चीही मदत घेतली जाणार आहे. पोलिसांकडे दोन सर्व्हेलन्स व्हॅन आहेत. त्याद्वारे पोलीस गर्दीला कॅमेऱ्यात टिपणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिरवणूक मार्गांची महावितरण, महापालिका अशा संबंधित विभागांसोबत पाहणी करून मार्गांमधील अडथळे हटविण्यात येणार आहेत.
आक्षेपार्ह देखावे टाळावेत
गणेशोत्सवात मंडळांकडून विविध देखावे सादर केले जातात. आक्षेपार्ह देखावे मंडळांनी टाळावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गणेशोत्सव तसेच मिरवणुकीत सामाजिक संस्था, स्वयंसेवक, तसेच पोलीस मित्रांची मदत घेण्यात येणार आहे. विसर्जन घाटांवरही बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
गर्दी नियंत्रणासाठी नियोजन
गणेशोत्सव तसेच मिरवणुकीत गर्दी होते. यंदा गर्दीच्या ठिकाणी केले जाणारे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. ते रेकाॅर्डिंग पुढील वर्षीच्या आणखी काटेकोर नियोजनासाठी वापरले जाणार आहे. गर्दी अनियंत्रित होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. ‘क्राऊड मॅनेजमेंट’ करून पुढच्या वर्षीही गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडता येईल, असे पोलिसांनी नियोजन केले आहे.