पिंपरी : रेकी करून ज्वेलरी शाॅप व बँक फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या टोळीतील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी केली.
जगत बम शाही (वय २८, रा. मारुंजी, मूळ रा. नेपाळ), गणेश विष्णू शाही (वय ३३), खगेंद्र दोदी कामी (वय २७, दोघेही मूळ रा. नेपाळ), प्रेम रामसिंग टमाटा (वय ४२, रा. पुनावळे, मूळ रा. नेपाळ), रईस कादर खान (वय ५२, रा. गोरेगाव, मुंबई), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील बावधन बुद्रुक येथे जगदंबा ज्वेलर्स शॉपच्या शेजारी आरोपींनी चायनिजच्या व्यवसायासाठी दुकान भाड्याने घेतले होते. या चायनिज दुकानाच्या पोटमाळ्याच्या भिंतीला भगदाड पाडून आरोपींनी ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश केला. गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी न फुटल्याने दुकानातील चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाइल, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, असा तीन लाख ५५ हजारांचा मुद्देमाल आरोपींनी चोरून नेला. चोरीचा हा प्रकार १८ जून २०२१ रोजी उघडकीस आला. त्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. घटना घडल्यानंतर परिसरातील एक नेपाळी वॉचमन काम सोडून गेल्याने पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी अंबरनाथ येथून आरोपी जगत शाही याला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी गणेश शाही, खगेंद्र कामी, प्रेम टमाटा यांना ठाणे येथून तसेच रईस खान याला गोरेगाव येथून ताब्यात घेतले. आरोपींनी त्यांचे साथीदार शंकर चंद्र उर्फ कांचा लामा, अर्जून उर्फ ओम रावल (तिघेही रा. नेपाळ) आणि आरोपी लामा याचे झारखंड येथून बोलावलेले तीन साथीदार यांच्यासह हा गुन्हा केल्याचे आरोपींनी चौकशीदरम्यान कबूल केले.
आरोपी गणेश शाही व कांचा लामा हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत. सोनाराच्या शेजारील दुकान भाड्याने घेता येईल, अशा बऱ्याच ठिकाणांची त्यांनी पाहणी केली. बावधन येथील दुकाना भाड्याने घेत इतर साथीदारांना बोलावून १७ जूनला रात्री ज्वेलरी शॉपमध्ये चोरी केली. हे प्रकरण शांत झाल्यानंतर परत येऊन सांगवी परिसरात पाहून ठेवलेले दुकान भाड्याने घेऊन आरोपी तेथे चाेरी करण्याच्या विचारात होते.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त डॉ. पंशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, सिद्धनाथ बाबर, सहायक उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, संजय गवारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
फेसबुक मेसेंजरचा वापरआरोपी गणेश शाही व शंकर चंद्र लामा यांनी त्यांच्या साथीदारांसह ३० मे २०२१ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे स्थानिक वॉचमनच्या मदतीने एका बँकेचे शटर कापून चोरी केल्याचे उघड झाले. आरोपींनी यापूर्वी याचप्रकारे यापूर्वी अनेक गुन्हे केलेले आहेत. गणेश शाही याच्या विरोधात घरफोडी व दरोड्याच्या प्रयत्नाचे १२ गुन्हे दाखल आहेत. आरोपी प्रेम टमाटा याच्या विरोधात चार गुन्हे दाखल आहेत. आरोपी शंकर चंद्र लामा याच्या विरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे धूर्त व चलाख असून ते फेसबुक मेसेंजरचा वापर करून एकमेकांना ऑडिओ व व्हिडीओ कॉल करतात.