पिंपरी : वेगवेगळ्या नावांनी स्थापन झालेल्या स्थानिक गुंडांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून टोळीयुद्ध भडकत आहे. त्यांच्यात वारंवार अंतर्गत धुसफूस सुरू असते. विशिष्ट परिसरात आपली दहशत निर्माण करून ती टिकविण्यासाठी ते एकमेकांवर चाल करून जातात. वर्चस्व सिद्ध करण्याच्या मोहापायी एकमेकांच्या जिवावर उठण्यापर्यंत त्यांनी मजलमारली आहे.रावण टोळी आणि महाकाली टोळीच्या गुंडांमध्ये घडलेल्या चकमकीतून टोळीयुद्ध भडकल्याचे जाणवू लागले आहे. महाकाली टोळीतून बाहेर पडलेल्यांनी स्थापन केलेली रावण टोळी, या दोन टोळ्यांमधील वर्चस्ववादातून नुकताच आकुर्डीत खून झाला. या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न अनिकेतच्या टोळीतील गुंडांकडून होत आहे. त्यातून टोळीयुद्ध भडकल्याचे निदर्शनास येत आहे. चिंचवड (वेताळनगर), आनंदनगर, पिंपरी कॅम्प, भाटनगर, पिंपरीगाव, नेहरुनगर, गांधीनगर, विठ्ठलनगर, भोसरीतील बालाजीनगर, लांडेवाडी झोपडपट्टी, दिघी, चºहोली, चिखली, रावेत, कासारवाडी, वाकड, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी आदी ठिकाणचे गुंड स्थानिक टोळ्यांमध्ये सक्रिय आहेत. या टोळ्या स्थानिक पातळीवर कार्यरत आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये तरुणांचे ग्रुप तयार होतात. तेच पुढे टोळ्यांशी संलग्न होत आहेत. त्या त्या परिसरातील गुंडांच्या टोळ्या तेथील नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम करतात. अनेकदा त्यांच्यातील अंतर्गत वादातून परिसरातील मोटारींची तोडफोड, जाळपोळ केली जाते. काही वेळा घरांवर दगडफेक करण्याचे प्रकार घडवून आणले जातात. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. त्याचा या टोळ्यांमधील गुंड फायदा उठवितात.बेकायदा पिस्तूल बाळगणारे वेळोवेळी पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर शहरात पिस्तूल आणले जात आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील तरुणांकडे सहज पिस्तूल येत आहेत.विविध परिसरातील सुमारे ९० गुंडांवर तडीपारीची कारवाई झालेली आहे. पोलिसांकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जातात. मात्र, तरीही गुंडगिरीला आळा घालणे शक्य झालेले नाही. कामगार नेते प्रकाश चव्हाण, नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खुनी हल्ल्यांसाठी अशाच स्थानिक गुंडांच्या टोळ्यांचा वापर करण्यात आल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आलेले आहे. मोठ्या स्वरूपाच्या गुन्हेगारी कृत्यात या टोळ्यांचा सहभाग घेण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. माजी नगरसेवक कैलास कदम यांना मारण्याची सुपारी देण्यात आली. त्यातही अशाच गुंडांचा सहभाग घेण्यात आल्याचे उघड झाले आहे.
वर्चस्ववादातून भडकले टोळीयुद्ध, उद्योगनगरीत अशांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 3:26 AM