पिंपरी - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवजागर प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेगुरुजी व हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यासह साथीदारांविरोधात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी सामाजिक कार्यकर्त्या अनिता साळवे यांच्या तक्रारीवरून या दोघांविरोधात अॅट्रॉसिटी, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव व असंघटित गुन्हेगारीचा गुन्हा नोंदवला आहे.पिंपरी-चिंचवड शहरात कोरेगाव भीमा घटनेचे पडसाद उमटले. पिंपरी चौकातून आलेल्या जमावाने मंगळवारी दुपारी दोन वाजता रस्त्याच्या बाजूला असलेल्या वाहनांची तोडफोड केली. काही प्रमाणात दगडफेक झाली. या वेळी व्यापारी व व्यावसायिकांनी तातडीने दुकाने बंद केली.पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तातडीने पिंपरी चौकातील जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. पिंपरी चौकात कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर जमावाने दोघांना अटक करण्याची मागणी केली.पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये सर्वत्र शांतता असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सोशल मिडियावरुन अफवा पसरविणाºयांंवर कडक कारवाई केली जाणार असून अक्षेपार्ह पोस्ट काढून टाकाव्यात. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरविणाºयांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.- गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३देहूत वाहनांचे नुकसानदेहू : देहूतील मुख्य कमानीजवळील वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये एक जण जखमी झाला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर काहीजण जमले. संतप्त जमावाने तोडफोड केली. यामुळे परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. यासह बँक आॅफ महाराष्ट्र व आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटरचे नुकसान झाले आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.किवळे : किवळेतील मुकाई चौक भागातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. विकासनगर, इंद्रप्रभा सोसायटी, दांगट कॉर्नर भागातील सर्वच दुकाने पाचनंतर बंद ठेवण्यात आली होती. देहूरोडचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे, उपनिरीक्षक मनोज मोरे यांनी बंदोबस्त ठेवला होता.खडकीत तणावपूर्ण शांतताखडकी : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दगडफेक, जाळपोळीचे पडसाद दुसºया दिवशी खडकीत उमटले. येथील व्यापाºयांची दुकाने बंद करण्यास भाग पाडले. घोषणाबाजी केल्यामुळे काही काळ खडकीत तणावाचे वातावरण झाले होते.चिंचवडमध्ये पोलीस बंदोबस्तचिंचवड : चिंचवड स्टेशन परिसरात घोषणाबाजी करीत पुणे-मुंबई महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवली.रुपीनगर-तळवडेत निषेध मोर्चातळवडे : रुपीनगर, तळवडे परिसरात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. सायंकाळी तळवडे गावातील भीमज्योत मित्र मंडळाच्या वतीने शांततेत निषेध मोर्चाचे आयोजन केले. या वेळी परिसरातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येनेसहभाग घेतला.
कोरेगाव भीमा घटनेचे पिंपरीत पडसाद : संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 3:41 AM