पिंपरी : संचारबंदी असतानाच गँगवारमुळे निगडीतील ओटास्कीम परिसर हादरला आहे. यात सोमवारी (दि. १९) रात्री पवणेनऊच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा खून झाला. त्याचा बदला म्हणून मंगळवारी (दि. २०) दुपारी खुनी हल्ल्या करून एका तरुणाला गंभीर जखमी केले.
आकाश उर्फ मोन्या गजानन कांबळे (वय २४, रा. सेनेटरी चाळ, भीमनगर, पिंपरी), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत भरत दिलीप लोंढे (वय २०, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल संतोष जाधव (वय १८), हेमंत खंडागळे (वय १८), गणेश धोत्रे (वय १८), यश उर्फ गोंदया खंडागळे (वय १९), वैभव वावरे (वय २१), श्रवण कुऱ्हाडे (वय १८, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काय रे कोठे चाललाय, असे मयत आकाश याने रागात विचारले. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. ओटास्कीम येथे अण्णाभाऊ वासहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी आणि मयत आकाश हे बोलत थांबलेले असताना आरोपी तिथे आले. आरोपींनी लोखंडी चॉपरसारखे धारदार शस्त्र आकाशच्या पोटात खुपसले. कोयता उगारून शिवीगाळ करून परिसरात दहशत निर्माण करून आरोपी पळून गेले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान जखमी आकाशचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलमवाढ करून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
आकाश ऊर्फ मोन्या कांबळे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या मित्रांनी मंगळवारी दुपारी खुनी हल्ला केला. आकाश कांबळे याच्या खून प्रकरणातील आरोपींसोबत उठबस असलेला शक्तीुमान प्रकाश कांबळे (वय २३, रा. ओटास्कीम, निगडी) याच्यावर हा हल्ला करण्यात आला. भर दिवसा, भर रस्त्यात आठ जणांनी शक्तीमान याला सिमेंटचा गट्टू आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात शक्तीमान गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खुनी हल्ला केल्याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात येत होता.