पिंपरी : सिलेंडरचा काळाबाजार होत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. यात १४५ सिलेंडर, इतर साहित्य, असा ८१ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. मुळशी तालुक्यातील भोईरवाडी येथे मंगळवारी (दि. ५) हिंजवडीपोलिसांनी ही कारवाई केली.
संताजी तानाजी माने (वय २३, रा. भोईरवाडी, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा घरगुती वापराचा गॅस विनापरवाना मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये भरून ते सिलिंडर चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भोईरवाडी येथे आई गॅस इंटरप्रायजेस या दुकानात छापा मारला. कमर्शिअल वापराच्या १९.३ किलोच्या मोठ्या सिलिंडमधील गॅस चार किलोच्या लहान सिलिंडरमध्ये भरून आरोपी तो लहान सिलिंडर त्याच्या ओळखीच्या लोकांना विक्री करीत असताना मिळून आला. कोणताही परवाना न घेता अवैधरित्या आरोपी हे काम करीत होता. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, उपनिरीक्षक अरविंद हिंगोले, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, मच्छिंद्र काळे, महेश शिंदे, इसाक शेख, रवी पवार, आकाश पांढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.