पिंपरी : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत जेष्ठ नागरिकाने तो सिलेंडर मोकळ्या जागेत आणला. त्यावेळी आगीच्या झळांमुळे चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली.
चिंचवड परिसरातील सुदर्शननगर भागातील रहिवासी शिवाजी कृष्णाजी भोंडवे यांच्या बंगल्यात गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. भोंडवे हे तूप तयार करण्यासाठी बंगल्याच्या शेडमध्ये घरगुती वापराच्या गॅसची शेगडी लायटरने पेटवित होते. त्यावेळी गॅसची अचानक गळती होवून सिलेंडरने पेट घेतला. पेट घेतलेला गॅस सिलेंडर भोंडवे यांनी तारेच्या आकडीच्या साह्याने बाहेर आणला. त्यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनाच्या मागील भाग जळून खाक झाला. तरीही न घाबरता भोंडवे यांनी पेटता सिलेंडर बाहेर आणून त्याच्यावर पाणी व वाळूचा मारा सुरू ठेवला होता.
सिलेंडरने पेट घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर पिंपरी - चिंचवड स्कूल बस चालक-मालक संघटनेचे बाबासाहेब भालदार यांनी महापालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष सोरटे, शिवला झनकर, दत्ता रोकडे, विकास बोंगाळे, शाम इंगवले, पंकज येडके यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.