पिंपरी : कासारवाडी येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये क्लोरीन वायू गळती झाली. पाण्यामध्ये वायुगळती झाल्याने पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या नागरिकांना अचानक त्रास जाणवू लागला. तलावामध्ये 22 लोक पोहत होते. त्यापैकी अकरा नागरिकांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोहत असताना नागरिक अचानक अस्वस्थ झाल्यानंतर अग्निशामन विभागाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत जीव रक्षकांनी काही नागरिकांना बाहेर काढले होते. बाहेर काढलेल्या नागरिकांना तात्काळ वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. तसेच तलावातील गॅस गळती थांबवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये कोणीही गंभीर नसल्याचे वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.