पिंपरी : कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात गौतमी पाटीलचे रंगतदार नृत्यही झाले. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला.
अमित शंकर लांडे आणि मयूर नादेव रानवडे (दोघेही रा. कासारवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार दत्तात्रय कांबळे यांनी मंगळवारी (दि. २३) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमी पाटील हिचा सांस्कृतिक गाण्यांचा कार्यक्रम कासारवाडी येथे सोमवारी (दि. २१) आयोजित केला होता.
त्याबाबत आयोजकांकडून भोसरी पोलिस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज देण्यात आला होता. मात्र, गौतमी पाटील आणि राडा हे समीकरण सुरू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या कारणास्तव भोसरी पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली. तसेच आयोजकांनी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घ्यावी, असेही सुचवले. मात्र आयोजकांनी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेतली नाही.
पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात गौतमी पाटीलसह तरुण देखील थिरकले. मात्र, परवानगी नाकारलेली असतानाही कार्यक्रम घेतल्या बाबत भोसरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.