पिंपरी : जमिनीच्या विकसनाचे अधिकारपत्र देऊन २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर ती जमीन पुन्हा दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकाला विकसनासाठी देऊन फसवणूक केली. पिंपळे गुरव येथे २७ ऑक्टोबर २०२० रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सखाराम हरिभाऊ काशिद (वय ७२) व त्यांचा मुलगा सुहास सखाराम काशिद (वय ४३, दोघे रा. पिंपळे गुरव) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी किशोर शंकर गारवे (वय ६२, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २६) फिर्याद दिली. आरोपी सखाराम काशिद यांनी पिंपळे गुरव येथील मिळकत संपूर्ण त्यांच्या मालकीची असल्याचे भासवून संपूर्ण क्षेत्र विकसनाकरिता दिले. त्याबाबत २०१६ मध्ये फिर्यादी यांना अधिकारपत्र देऊन आरोपीने फिर्यादी यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना विश्वासात न घेता मिळकतीचे पाच हिस्से केले. मुलाचा व मुलींचे हिस्से वेगवेगळे असल्याचे भासवून ती मिळकत पुन्हा विकसनासाठी दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकांना दिली. त्यांच्याकडून त्याचे पैसे घेतले. फिर्यादी यांना विश्वासात न घेता विश्वासघात व अपहार करून त्यांची फसवणूक केली.