पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती १५ दिवसांत घालवू या दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली नाही. अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबत दिलेला शब्द पाळला नाही. शहरातील अवैध बांधकामांचा १०० टक्के शास्तीकर माफ करावा यामागणीसाठी विरोधी पक्ष, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज (गुरुवारी) महापालिका मुख्यालयासमोर 'घंटानाद', 'शंखनाद' आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, पंकज भालेकर, स्वराज अभियानचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, माजी महापौर कवीचंद भाट,नगरसेविका संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते तात्या तापकीर, भारिप बहुजन महासंघाचे गुलाब पानपाटील, काँग्रेसचे संग्राम तावडे, संदीपने झोंबडे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, शेकापचे हरिष मोरे, शिवशाही व्यापारी सेनेचे युवराज दाखले, गणेश आहेर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, सुभाष साळुंके, प्रल्हाद कांबळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती १५ दिवसात माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याची पुर्तता केली नाही. तसेच त्यांनी बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबतचा दिलेला शब्द देखील पाळला नाही. ९ जानेवारीला चिंचवडमधील जाहीर कार्यक्रमात केलेली घोषणेची मुदत २४ तारखेला संपली आहे. मात्र, प्रश्न सुटला नाही.
पिंपरीत शास्तीकर माफीसाठी विरोधकांचे महापालिकेसमोर 'घंटानाद'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 2:33 PM