पिंपरी : घरकुल प्रकल्पाच्या नामकरणाच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासुन वाद निर्माण झाला आहे. घरकुलवासियांच्या फेडरेशनचे पदाधिकारी आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यामध्ये आतापर्यंत सुरू असलेल्या शितयुद्धाला वेगळे वळण लागले आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचे खासगी स्वीय सहायक म्हणुन काम करणाऱ्या राहुल नामक व्यकतीबरोबर तेथील स्थानिक रहिवाशांमध्ये नामकरणाच्या मुद्यावरून वादंग झाले. शाब्दिक चकमकीनंतर शिवीगाळ करण्यापर्यंत हे प्रकरण गेले. त्यामुळे रहिवाशांनी थेट चिखली पोलीस ठाण्यात जाऊन राहुल विरुद्ध फिर्याद दिली. तसेच राहुल यास एकनाथ पवार यांची फूस असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे सकाळी घरकुल परिसरात तणावाचे वातावरण होते.
चिखली घरकुल प्रकल्पातील हरीओम सोसायटीजवळ सकाळी ११ च्या सुमारास वादंगाचा प्रकार घडला. घरकुलचे रहिवासी रघुनाथ सावंत हे एकनाथ पवार यांच्याशी चर्चा करीत होते. त्यावेळी त्यांचे स्वीय सहायक राहुल याने अपशब्द वापरले. त्यामुळे रहिवाशांनी एकनाथ पवार आणि त्यांच्या स्वीय सहायकाविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. फेडरेशनचे अध्यक्ष सुधाकर धुरी यांनी चिखली पोलीस ठाण्यात जाऊन राहुल नामक व्यकतीविरोधात तक्रार दिली. राहुल नामक व्यकतीला सत्तारूढ पक्षनेते पवार यांची फूस असावी, अशी शक्यता त्यांनी व्यकत केली आहे. तसेच येथील वातावरण दुषित करण्याचा जातीय सलोख्याला बाधा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासुन घरकुलच्या नामकरणाचा मुद्दा वादग्रस्त बनला आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती सभेत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. मात्र घरकुलवासियांनी स्थापन केलेल्या फेडरेशनने या नामकरणास विरोध केला आहे. स्थानिक रहिवाशांच्या भावना विचारात न घेता, फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता, सत्ताधारी पक्षाने परस्पर नामकरणाचा निर्णय घेतला आहे. नामकरणाच्या मुद्यावरून वादंग सुरू झाले आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते एकनाथ पवार आणि घरकुल फेडरेशनचे पदाधिकारी यांच्यात आव्हान- प्रतिआव्हान या स्वरूपातही वादंग झाले. सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या नामकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी घरकुलमधील रहिवाशांनी मागील आठवड्यात आंदोलन केले. नामकरणास कडाडून विरोध केला. त्यांनी सनदशीर मार्ग अवलंबावा.
कामानिमित्त घरकुलमध्ये गेलो असता, काही व्यकतींनी नामकरणाच्या मुद्यावर वाद घालण्यास सुरूवात केली. सनदशीर मार्गाने जा, माझ्यापेक्षा मोठ्या नेत्यांकडे दाद मागा. असे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तेथून निघून जात असताना, नागरिकांनी घोषणाबाजी केली. काही लोक जाणीवपुर्वक राजकारण करत आहेत.- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते महापालिका