पिंपरी : गझला, साहित्यिक गप्पा, विनोद, कविता, लावणी, भक्तिगीत आणि आठवणी सांगत ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. ‘पिंपरी-चिंचवड साहित्य मंच’च्या वतीने बहारदार साहित्य मैफलीचे आयोजन शिवतेजनगर येथे करण्यात आले. शहरातील अनेक साहित्यिकांनी मैफलीत आपला सहभाग नोंदवला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. झुंजार सावंत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, ज्येष्ठ कवी अशोक कोठारी, समरसताचे अध्यक्ष रमेश वाकनीस हे उपस्थित होते. राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविक केले.शोभा जोशी यांच्या ‘गेल्या जत्रेत झाली आपली भेट, कारभारी आठवा की नीट’ या लावणीने सुरुवात झाली. धनेश बडवाने यांनी ‘बागेत चालताना नुसते प्रहार झाले’, रमेश वाकनीस यांनी ‘कहानी रही या जवानी रही, समयकी बडी मेहरबानी रही’, प्रदीप गांधलीकर यांनी ‘दु:ख हे नेहमी मजवरी भाळले, त्याचसाठी सुख मी तुज टाळले’, दिनेश भोसले यांनी ‘ सहजा सहजी मतला सुचला जाता जाता’, अशोक कोठारी यांनी ‘ प्रत्येक श्वास त्याला माझा सलाम आहे ’ , पीतांबर लोहार यांनी ‘आलीस तू अशी ती मी बावरून गेलो, आनंद हा मनाशी मी बावरून गेलो’, तर राजेंद्र घावटे यांनी, ‘आज कोणीही नव्या वाटेत प्रवासात नाही, आज ऊर्मी कोठलीही माझिया श्वासात नाही’ अशा सादर केलेल्या गझलांना दाद मिळाली. नंदकुमार मुरडे यांची ‘धर्मास सांधणारा माणूस शोधतो मी.. सत्यास मानणारा माणूस वंदितो मी’ही गझलही दाद मिळवून गेली. नितीन हिरवे, सुभाष चव्हाण, सुप्रिया सोलांकुरे यांनी अनेक प्रसंग, नामवंतांचे साहित्य, साहित्यिक अभिरुची आणि आठवणी कथनाद्वारे कार्यक्रमात रंगत आणली. सूत्रसंचालन प्रदीप गांधलीकर यांनी केले. आभार प्रदर्शन जयश्री घावटे यांनी केले.(प्रतिनिधी)
गझल, कवितांनी रंगली मैफल
By admin | Published: October 11, 2016 1:17 AM