पिंपरी : महापालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मतदारांशी संपर्क साधण्याची एकही संधी इच्छुकांकडून दवडली जात नाही. निवडणुकीपूर्वीची ही दिवाळी एक चालून आलेली चांगली संधी मानून भेटकार्डांपासून मिठाई आणि दिवाळीसाठी लागणारे फराळाचे साहित्य घरपोच देण्यापर्यंतची मजल इच्छुकांनी मारली आहे. काही दिवसांवर निवडणूक असल्याने यंदाची ही दिवाळी मतदारांचा आनंद द्विगुणित करणारी आहे. दिवाळी आली की, खर्च आलाच. कुटुंबातील सर्वांना कपडे, मिठाई खरेदी, नेहमीच्या किराणाबरोबर दिवाळीतील फराळासाठी लागणारे साहित्य याचा अतिरिक्त खर्च होत असतो. यंदाच्या दिवाळीत मात्र अनेक मतदारांचा फराळ साहित्य खरेदीचा खर्चाचा भार इच्छुकांनी पेलला आहे. तेलाच्या डब्यापासून ते रवा, पिठी साखर, मैदा असे सर्व काही पॅक केलेल्या बॅगा मतदारांच्या घरी नेऊन दिल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने या दिवाळीत मतदार राजा अशा स्वरूपाची वागणूक सामान्य मतदाराला मिळू लागली आहे. फेर प्रभागरचना झाल्यामुळे जुन्या प्रभागांना नव्याने काही भाग जोडला गेला आहे. त्यामुळे नव्याने जोडल्या गेलेल्या भागातील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी दिवाळी हे निमित्त मानले जात आहे. त्यांचे दिवाळी शुभेच्छा फलक झळकले आहेत. (प्रतिनिधी)भेट स्वरूपात देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना अधिक मागणी वाढली आहे. काही इच्छुकांनी जवळच्या कार्यकर्त्यांसाठी स्मार्ट फोन मोठ्या प्रमाणावर खरेदी केले आहेत. ज्या कारखान्यात, वर्क्स शॉपमध्ये काम करतो, त्या कारखान्याच्या मालकाकडून मिठाईचा बॉक्स मिळाला नसला, तरी निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांकडून मतदारांना आवर्जून भेट कार्ड आणि मिठाईचे बॉक्स पाठवले जात आहेत. एका प्रभागात अनेकजण इच्छुक असल्याने एकापेक्षा अधिक मिठाई बॉक्स मतदारांना मिळू लागले आहेत.
फराळाच्या साहित्यासह भेटवस्तू घरपोच
By admin | Published: October 28, 2016 4:32 AM