पिंपरी :वाकड येथे बेदरकारपणे कार चालवून तरुणीला धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे खळबळ उडाली. हिंजवडीकडूनवाकडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाकड पुलालगत बस थांब्याजवळ माउली स्नॅक्स दुकानासमोर २३ मे २०२४ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी बुधवारी (दि. १२) गुन्हा दाखल केला.
तुषार नेमाडे, असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे. उत्कर्ष संजयसिंह परदेशी (२३, रा. कॅम्प, पुणे मूळगाव काद्राबाद, जालना) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आकांक्षा संजयसिंह परदेशी (२३, रा. कॅम्प, पुणे मूळगाव काद्राबाद, जालना), असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. भादंवि कलम २७९, ३३७ मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अन्वये या अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद यांची बहीण आकांक्षा ही २३ मे २०२४ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हिंजवडीकडून वाकडकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने चालत जात होती. त्यावेळी या रस्त्यावरील बसथांब्याजवळ माउली स्नॅक्स दुकानासमोर आकांक्षा चालत जात असताना तुषार नेमाडे याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव आणि बेदरकारपणे चालवून आकांक्षा हिला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात आकांक्षा जखमी झाली.
फिर्यादी उत्कर्ष परदेशी याबाबत म्हणाले, अपघातामध्ये माझी बहीण आकांक्षा हिला मुका मार लागला. त्यानंतर आम्ही मुंबइला आलो. ती सध्या नाॅर्मल असून काही दिवस आराम करण्याबाबत डाॅक्टरांनी सांगितले आहे. अपघात प्रकरणी आम्ही फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
थरकाप उडवणारा व्हिडिओ...
दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ मंगळवारी (दि. ११) सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये आकांक्षा पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. त्यामुळे आकांक्षा काही अंतरावर दूरवर फेकली गेली. तसेच कार भरधाव दुकानात घुसली, असे व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या व्हिडिओत दिसून येत होते.
पुण्यातील पोर्शे प्रकरण ताजे असतानाच....
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाकड येथे हा थरकाप उडविणारा अपघात झाला. मात्र, याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ व्हायरल झाला. गुन्हा दाखल न झाल्याने सोशल मीडियातून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल केला.