पिंपरी : लग्नाच्या कारणावरुन झालेल्या वादातून प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याची घटना पिंपरी येथे घडली. किरण अरुण काते (वय २३, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी अक्षय विनायक लाखे (वय २०, रा. भोरमळा, जुना ओरा रोड, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीचा मामा रविंद्र दामोदर ससाणे (वय ३८, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरण काते आणि अक्षय विनायक लाखे यांच्यात प्रेमसंबंध होते. बुधवारी रात्री ते भेटले असता त्यांच्यात लग्नाच्या कारणावरुन भांडण झाले. त्यावेळी आरोपी अक्षयने किरण हिचा एचए कॉलनीतील बंगला नंबर एफ २ येथे गळा दाबून व डोक्यात वीट घालून खून केला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तपासासाठी तीन पथके तयार करुन किरण राहत असलेल्या वस्तीतील लोकांकडे चौकशी करुन माहिती घेतली असता अक्षय हा किरणला बुधवारी भेटला असल्याचे समोर आले. तसेच तो बुधवारी रात्री महात्मा फुलेनगर झोपडपट्टी येथे बहिणीकडे आला होता, अशीही माहिती मिळाली.
त्यानंतर लगेचेच पोलिसांनी आरोपीच्या बहिणीकडे चौकशी केली असता अक्षय हा नाशिकला जाण्यासाठी नाशिकफाटा येथे गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथक तातडीने नाशिक फाटा येथे गेले असता आरोपी अक्षय हा शिवशाही बसमध्ये बसला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ निरिक्षक कल्याण पवार, निरिक्षक रंगनाथ उंडे, सहायक निरिक्षक अन्सार शेख, उपनिरिक्षक हरिदास बोचरे, उत्कर्षा देशमुख, कर्मचारी राजेंद्र भोसले, आजिनाथ सरक, रमेजा गोलंदाज, प्रतिभा मुळे, रोहित पिंजरकर, अविनाश देशमुख, सुहास डंगारे, नामदेव राऊत यांच्या पथकाने केली.