पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.३ टक्के लागला असून यंदाच्या निकालांमध्ये पुन्हा पोरींनी बाजी मारली आहे. तर शहरातील १२६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर चिंचवडची चिंतामणी रात्र प्रशाला आणि प्राधिकरणातील चिंचवड बधीर मुक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल लागण्याची प्रतीक्षा होती. कोरोना कालखंडानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने प्रथमच प्रत्यक्षपणे दहावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेमध्ये पिंपरी-चिंचवड शहरासह हवेली, खेड, मावळ, मुळशी तालुक्यातील मुलींनी दहावीच्या निकालात बाजी मारल्याचे दिसून येत आहे. २० जूनपर्यंत निकाल लागेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस अगोदरच निकाल लागला आहे. दहावीच्या बोर्डाने निकालाबाबत जाहिर केल्यानंतर आज सकाळपासूनच निकालाची प्रतीक्षा मुले आणि पालकांना होती. हा निकान ऑनलाईन असल्याने तसेच संकेत स्थळ हे दुपारी एकला खुले होणार असल्याने निकालाबाबत उत्सुकता होती.
उत्सुकता आणि यशाचा आनंद
निकालाची वेळ जशी जवळ येऊ लागली. तशी काही मुले सायबर कॅफे मध्ये गेली होती. तर काही मुले आपल्याच मोबाईमध्ये निकाल पाहण्यासाठी सज्ज झाली होती. दुपारी एकला बोर्डाने संकेतस्थळ खुले केल्यानंतर मुले आणि पालकांनी निकाल पाहून आनंद साजरा केला. तसेच मुलांनी यशाबद्दल पेढेही भरविले. तसेच पालकांनीही मुलांच्या यशाचा आनंद साजरा केला.
शहराचा निकाल वाढला
पिंपरी-चिंचवड शहरातून एकूण पिंपरी-चिंचवड शहरातून १०हजार ६१६ मुले, १९७८ मुली असे एकूण १९ हजार ५९७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १० हजार ३१६ मुले, आठ हजार ३३४ मुली असे एकूण १९ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचा निकाल ९७.३, तर मुलींचा निकाल ९८.१ असा शहराचा एकूण निकाल ९७.३ टक्के लागला आहे.
पिंपरी-चिंचवडच्या पोरीच हुषार
तसेच हवेली परिसरातून ७ हजार ९२४ मुले, ६ हजार २८५ मुली असे एकूण १४२०९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी ७४०१ मुले, ६११५ मुली असे एकूण १३ हजार ५१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालांमध्ये ९३.१ टक्के मुले, ९७.२९ टक्के मुली असा हवेलीचा एकूण निकाल ९५.४९ टक्के लागला आहे. खेड तालुक्यातून दहावीच्या परीक्षेस ३ हजार ८६६ मुले, ३१८३ मुली असे एकूण ७ हजार ४९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३न हजार ६७४ मुले असे एकूण ९ हजार ७९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचा निकाल ९५.०, तर मुलींचा निकाल ९७.९२ टक्के आणि खेड तालुक्याचा निकाल ९६.५ टक्के लागला आहे. मावळ तालुक्यातून दहावीच्या परीक्षेमध्ये २८७४ मुले, २५१६ मुली असे एकूण ५३२० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २ हजार ७७८ मुले २४८५ मुली असे एकूण ५ हजार २६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये मुलांचा ९६.५ तर मुलींचा ९८.७५ असा एकूण तालुक्याचा निकाल ९७.३ टक्के लागला आहे. मुळशी तालुक्यातून १०१३ मुले, १४६० मुली असे एकूण ३ हजार ७३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १५२९ मुले, १४२० मुली असे २ हजार ९५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचा निकाल ९४.३ टक्के तर मुलींचा निकाल ९७.३ असा एकूण मुळशीचा निकाल ९६.५ टक्के लागला आहे.