पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या वतीने मार्च २०२३मध्ये घेतल्याला दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. २) दुपारी एक वाजता जाहीर झाला. पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९५.६० टक्के लागला असून निकालात २.२३ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा ऑफलाइन परीक्षा झाल्यामुळे निकालाविषयी उत्कंठा दाटली होती. मुला व मुलींनीही निकालात अव्वल बाजी मारली. मुलांचा निकाल ९३.९९ टक्के तर मुलींचा निकाल ९४.४८ टक्के लागला आहे.
शहरातुन दहावीच्या परीक्षेला एकूण २०१६४ विद्यार्थी बसले होते. यामध्ये १०८८४ मुले व ९२८०मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यातून १०२३० मुले व ९०४७ मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण १९२७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरातील तब्बल ११८ शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राज्याचा निकाल ९३.८३ टक्के एवढा लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.