रहाटणी : प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी हा अनेक समस्यांनी ग्रासला आहे. येथील हवा तसा विकास झाला नाही. या प्रभागाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी मतदारांनी तरुणांना संधी द्यावी, असे मत प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी मधील मागास प्रवर्ग पुरुष या गटातील अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांनी मतदारांशी संवाद साधताना केले. सोमनाथ तापकीर हे मतदारांच्या गाठीभेटी घेत असून, अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांचे चिन्ह असलेली शिट्टी हातात घेऊन तरुण कार्यकर्ते प्रभागात प्रचार करीत आहेत. या प्रभागाचा दांडगा भौगोलिक अभ्यास असल्याने येथील कोणता विकास प्रामुख्याने झाला पाहिजे याची पूर्ण जाण तापकीर यांना आहे, असे मत सुजाण नागरिकांनी व्यक्त केले. मतदारांशी संवाद साधताना सोमनाथ तापकीर म्हणाले, ‘‘काळेवाडी हा प्रभाग पवना नदीपात्राने वेढला आहे. नदीतील दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी मागील अनेक वर्षांपासून या नदीपात्राला संरक्षण भिंत बांधण्यात आली नाही. या ठिकाणी नियोजित विकास आराखड्यातील डीपी रस्ते विकसित करण्यात आले नाहीत. यांसारखे कितीतरी प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी संधी द्यावी.’’(वार्ताहर)
तरुणांना संधी द्यावी
By admin | Published: February 16, 2017 3:10 AM