पिंपरी : लोन क्लीअरन्स प्रमाणपत्र देण्यासाठी मोबाइलवर ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. तसेच, त्यावर बँकेची माहिती भरण्यास सांगत बँक खात्यातून ऑनलाइन पैसे भरून घेत दहा लाखांची फसवणूक केली. ही घटना बुधवारी (दि. २२) वाकड येथे घडली.
याप्रकरणी चैतन्य श्रीकांत अत्रे (वय ६४, रा. वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ८९२७४९७६२४ मोबाइल क्रमांकधारक अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना कल्याण डोंबिवली येथील त्यांचे घर विकायचे आहे. त्यासाठी कॅनरा बँक डॉक यार्ड शाखेतून लोन क्लीअरन्स प्रमाणपत्र हवे आहे. त्यासाठी फिर्यादी यांनी कॅनरा बँकेचा कस्टमर केअर नंबर सर्च करून त्यावर फोन केला असता अनोळखी इसमाने आमच्या वरिष्ठांशी बोला, असे सांगत दुसऱ्याकडे फोन दिला. त्यानंतर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीने ‘मी तुम्हाला व्हॉट्सॲप कॉल करतो’ असे सांगून फोन कट केला. थोड्या वेळाने ८९२७४९७६२४ या नंबरवरून फिर्यादी यांना व्हॉट्सॲपवर कॉल आला. त्यांनी फिर्यादी यांना मोबाइलमध्ये ‘अव्वल’ हे ॲप डाऊनलोड करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवण्यास सांगितले. त्यानंतर ॲपमध्ये बँक खात्याची माहिती भरण्यास सांगितली. तसेच, यूपीआय पिन टाकून बँक खात्यातून ९ लाख ९९ हजार ३२४ रुपये भरून घेत फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली.