पिंपरी : रस्ता ओलांडणाऱ्या पोवळा नामक दुर्मिळ सापाला जीवदान मिळाले आहे. ताम्हिणी घाटामध्ये सापाला सोडण्यात आले. वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेच्या वन्यजीव संरक्षकांनी जीवदान दिले.
चिखली येथील काही नागरिकांना रस्ता ओलांडताना एक तपकिरी साप दिसला. त्यानंतर साप दगडा खाली गेला. याबाबत वर्ल्ड फॉर नेचरचे वन्यजीव संरक्षक शंभू लोंढे यांना माहिती मिळाली. त्यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली. नागरिकांच्या निदर्शनास आलेला साप हा दुर्मिळ पोवळा जातीचा असल्याचे दिसून आले. वन्यजीव संरक्षकांनी त्याला सुरक्षितपणे पकडले. पुणे किंवा इतर परिसरात हा साप आढळत नसून त्याचा नैसर्गिक अधिवास वेगळा आहे. सापाची लांबी किमान १ फूट असून अतिशय चपळ असा हा साप वाचवण्यात यश आले. त्यानंतर सापाला ताम्हिणी घाटामध्ये सोडण्यात आले.
दुर्मिळ असलेल्या पोवळा सापाचे ‘स्लेन्डर कोरल स्नेक’, इंग्रजी नाव आहे. हा साप अत्यंत विषारी असून याच्या विषग्रंथीत नुरोटॉक्सिक प्रकारचे विष असते, असे वर्ल्ड फॉर नेचरचे संस्थापकीय अध्यक्ष शुभम पांडे यांनी सांगितले.