हिंजवडी : थेरगाव परिसरातून खळखळून वाहणारी पवना नदी पुन्हा प्रदूषित झाली. नदी पत्रात रसायन मिश्रित सांडपाणी मिसळल्यामुळे संपूर्ण नदीपात्रच फेसाळले आहे. त्यामुळे, जणूकाही थेरगावमध्ये हिमनदी अवतरल्याचे केवीलवान चित्र पहायला मिळत होते.
दरम्यान, गुरुवारी (दि.२) सकाळी केजुदेवी धरण परिसरात पवनानदी पात्र पूर्ण प्रदूषित झाल्याने नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत होते. थेरगाव परिसरात पवनेचे नदीपात्र वारंवार प्रदूषित होऊनही, महापालिका यावर ठोस कार्यवाही करताना दिसत नसल्याने स्थानिक नागरिक आणी पर्यावरण संस्था प्रचंड रोष व्यक्त करत आहे. मागील अनेक महिने केजुदेवी धरण परिसरात पवना नदीला जलपर्णीचा विळखा पडला होता. नदीची अक्षरशः गटारगंगा झाल्याने परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पावसाच्या कृपेने पवना नदी जलपर्णी मुक्त झाली मात्र, पुन्हा धरण परिसरात रसायनमिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने संपूर्ण नदीपात्र फेसाळले आहे. यामुळे, जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, पर्यावरणाचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केजुदेवी धरण परिसरात पवना नदी वारंवार प्रदूषित होत आहे. नदीचे पावित्र्य जपणे पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांना शक्य होत नसेल तर, मंत्रालयातील संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी नागरिक करत आहेत.