विश्वास मोरे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील गणेश तलावात सकाळी सातची वेळ..., तळ्यातील पाणी कमी झाल्याने अत्यंत कमी अशा पाण्यात महाशीर अर्थात देवमाशांची सुरू असलेली तडफड..., कमी आॅक्सीजन आणि दुषीत पाणी यामुळे गाळात रूतून अनेकांचा जीव वाचविण्यासाठी तगमग सुरू होती. त्यात काहींनी अखेरचा श्वास घेतला. जागरूक नागरिकांनी नगरसेवक अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, संवेदनशून्य लोकप्रतिनिधी आणि शासनव्यवस्थेला त्यांची तडफड समजलीच नाही.
पिंपरी-चिंचवड नवगनर विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथे गणेश तलाव असून त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाची निर्मिती केली आहे. तलावालगतच उद्यान निर्माण केले आहे. अर्थात हा पर्यटनासाठी हा परिसर प्रसिद्ध झाला आहे. मॉर्निंग वॉक, व्यायामासाठी या परिसरात नागरिक येत असतात. या तलावात अनेकवर्षांपासून मोठ्याप्रमाणावर मासे आहेत. तसेच तलावातील गाळ न काढल्याने तलावाची खोली कमी झाली आहे. मे महिन्यात या तलावातील पाणी कमी झाले होते. तसेच परिसरातील काही दुषीत पाणी तलावात आल्याने शेकडो लहान माशांचा मृत्यू मागील पंधरा दिवसांपूर्वी झाला होता. त्यामुळे या तलावात गेल्या आठवड्यात अन्नाच्या शोधार्थ चित्रबलाक आणि अनेक दर्मिळ पक्षी आले होते.
दुषीत पाण्याने शेकडो लहान माशांचा मृत्यू झाला असला तरी याठिकाणी असणारे मोठे मासे जीवंत होते. त्यांनतर महापालिकेने या भागातील गाळ काढण्याचे काम सुरू केले. गाळाचे प्रमाण अधिक असल्याने मोठयाप्रमाणावर यंत्रणा या ठिकाणी दिसून येत आहे. गणेश विसर्जन घाटाच्या बाजूचा गाळ काढल्यानंतर तलावातील पाणी एका बाजूला आले. दुसरीकडे विरूद्ध दिशेला असणारेही पाणी अलीकडे आले. त्यामुळे उद्यानाच्या बाजूने खोलगट भागातील पाणी कमी झाल्याने खाली गाळच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शनिवारपासून पाणी पातळी कमी झाल्याने तसेच गढूळ पाण्यामुळे या तलावातील माशांची तडफड सुरू असल्याचे दिसून आले. श्वास घेण्यासाठी अडचण येत असल्याचे दिसत होते. याबाबत स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनासही याबाबत माहिती दिली. मात्र, कोणीही ही बाब गांभिर्यांने घेतली नाही. परिणामी रविवारी सकाळी काही मासे मरून पडल्याचे दिसून आले. तर जीव वाचविण्यासाठी त्यांची तडफड सुरू असल्याचे दिसून आले. एका दिवसानंतरही कोणीही त्यांच्या मदतीला धावून अाले नाही.
असंवेदनशील लोकप्रतिनिधी, प्रशासन
गणेश तलावातील जलचरांबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन असंवेदनशील असल्याचे दिसून आले. तसेच या ठिकाणी येणारे नागरिकही केवळ सेल्फी आणि छायाचित्र काढण्यातच मशगूल असल्याचे दिसले. कोणीही त्या मुक्या जीवांना वाचविण्यासाठी पुढे आले नाही. तसेच प्राणी आणि पक्षीमित्रांनाही याचे काही देणे-घेणे नसल्याचे दिसून आले.
महाशीर ही दुर्मिळ जात
गणेश तलावात महाशीर या जातीचे मासे आहे. त्यांची लांबी किमान एक ते दोन फुट आहे. हा मासा मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीत देहू येथे आढळून येत होता. त्याला देवमासा असेही म्हणतात. तळेगाव दाभाडे परिसरात महाशीर माशांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. एकीकडे तळेगावात माशांचे संवर्धन होत असताना दुसरीकडे ही जात नष्ट होण्याची भीती आहे. गणेश तलावात हे मासे मोठ्याप्रमाणावर होते. मात्र, असंवेदनशीलतेमुळे महाशीर माश्यांचा जीव धोक्यात आहे. वेळीच हे मासे हलविले नाही तर पिंपरी-चिंचवडमध्ये ही जात नष्ट होईल.
महाशीर संवर्धनासाठी प्रयत्न
एकेकाळी पुणे जिल्ह्यातल्या इंद्रायणी नदीत आढळणारा महाशीर मासा १९८२ मध्ये नामशेष झाला. मात्र तळेगावच्या फ्रेन्डस आॅफ नेचर' आणि केंद्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी हा मासा परत इंद्रायणीमध्ये पहायला मिळणार आहे. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या देहु-आळंदीला येणारा प्रत्येक भाविक पूर्वी इंद्रायणी नदीतल्या महाशीर अर्थात देवमाशाचं दर्शन घेतल्याशिवाय परतत नसे. ९० च्या दशकात नदीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे हा मासा इंद्रायणीतून नामशेष झाला.