पिंपरी : कोकणात मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी भक्त जातात. यासाठी भक्तांकडून खासगी आणि प्रवासी वाहनांचा वापर करण्यात येतो. या प्रवासी वाहनांना राज्य सरकारने टोल माफी जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना टोल माफीचे पास पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात येत आहेत. शनिवार (दि.२७) पासून पास देण्यास सुरुवात करण्यात आली असून गणेशोत्सवकाळात देखील पासचे वाटप सुरु राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.
गणेश भक्तांनी पाससाठी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील आदे यांनी केले आहे.गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, टोलमाफी कशी घ्यावी याची माहिती अनेकांना नाही. त्यामुळे टोलमाफीसाठी लागणाऱ्या पासचे वितरण पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयातून केले जात आहे. पासच्या मागणीसाठीचा आवश्यक असेला अर्ज देखील तेथेच दिला जातो आहे.
टोल माफी अर्जात काय माहिती भराल?
टोल माफीसाठी भरण्यात येणाऱ्या अर्जात अर्जदाराचे नाव, वाहन क्रमांक, प्रवास कोठून कुठ पर्यंत करणार त्या ठिकाणांची नावे, वाहन क्रमांक याची माहिती भरायची आहे. हा अर्ज भरल्यानंतर संबंधित अधिकारी ती तपासून त्यानुसार पास देत आहेत. पाससाठी गाडीची कागपत्रे व आधारकार्ड सुद्धा दाखवावे लागत आहे.