पिंपरी : सोनसाखळी हिसकावणाऱ्या, मोबाईल तसेच वाहन चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट दोनला यश आले आहे. आरोपींना जेरबंद केल्याने सोनसाखळी चोरीचे १३, वाहनचोरीचे सात, मोबाईल चोरीचा एक आणि तोडफोडीचा एक असे २२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. पोलिसांनी जेरबंद केलेल्या संशयित आरोपींचे नाव महमंद मुस्ताक सिध्दीकी (वय २४, रा. यहिया कॉलनी, सिध्देश्वर मंदिराच्या पाठीमागे, पटेलनगर, लातूर), पाडुरंग बालाजी कांबळे (२३. रा. गीर ता. निलंगा जि. लातूर), तुषार ऊर्फ बाळा अशोक माने (२५ रा. वराळे रोड समता कॉलनी, तळेगाव दाभाडे) अर्जुन संभाजी कदम( २५ रा. नेवाळे बस्ती, केशवनगर, चिखली) अशी आहेत. तसेच त्यांना साथ देणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने विकत घेणारा आणि त्याची विक्री करणारे प्रक्षाल मनोज सोलंकी ( २३ ,रा प्रेमला पार्क, चिंचवड), मुराद दस्तगिर मुलाणी (३६, रा. वैभवनगर, पिंपरीगाव) यांना ही ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी, चिखली, भोसरी परिसरामध्ये घडलेले सोनसाखळी चोरीचे गुन्हे, चिखली परिसरातील तोडफोड आणि धारदार कोयत्यांचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्या प्रकरणी पोलिस तपास करत होते. गुन्हे घडलेल्या परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी करत गोपनीय खबऱ्यामार्फत पोलिसांनी आरोपींनी निष्पन्न केले. निष्पन्न झालेल्या संशयित आरोपींना मोबाईलचे तांत्रीक विश्लेषणाद्वारे शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले धारदार कोयते, तलवार, चोरीच्या पाच दुचाकी, १७ महागडे मोबाईल असा एकूण दोन लाख ४२ रुपये किमतीचा मुद्देमाल, दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.