पिंपरी : पहाटे फिरायला गेलेल्या आणि पायी चाललेल्या महिलांना सोनसाखळी चोरांनी लक्ष्य केले आहे. शहरात विविध ठिकाणी तीन सोनसाखळी चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे. कार्तिक हॉस्पिटलजवळील श्रीधरनगर येथे पहाटे पावणेसहाच्या दरम्यान फिरायला गेलेल्या महिलेला सोनसाखळी चोरांचा हिसका बसला.
मोटरसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे ५५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावल्याची फिर्याद चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दुसऱ्या घटनेत कामावर जाण्यासाठी सासूबाईंना घेऊन चाललेल्या महिलेच्या गळ्यातील ५६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले. चिंचवडमधील गांधी पेठ येथे २० डिसेंबरला पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी सासूबाईंना घेऊन दुचाकीवरून चाफेकर चौकाच्या दिशेने चालल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मंगळसूत्र हिसका मारून नेले.
तिसऱ्या घटनेत पायी जात असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र मोटारसायकलवरील चोरट्यांनी हिसका मारून नेले. चिंचवडमधील संभाजीनगर येथे ही घटना घडली. पराग बळीराम शिरसाठ (वय २६, रा. गोवर्धन हाऊसिंग सोसायटी, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.