पिंपरी : मंदिरात सापडलेला सोन्याचा दागिना दोन जणांनी पोलिसांकडे सुपूर्द केला. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा पोलिसांकडून सत्कार करण्यात आला. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. आकुर्डी येथील तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. यात महिलांची संख्या जास्त असते. या मंदिरात २६ ग्रॅम सोन्याचा दागिना रामया दुंडया हिरेमठ व प्रमोद परभाकर कापसे यांना सापडला.
भाविकाचा दागिना असावा, असे म्हणून त्यांनी तो दागिना पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे ठरविले. त्यानंतर निगडी पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांच्याकडे दागिना सुपूर्द केला. पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण, सपना सकुंडे, वर्षा खैरे, सी. वाघमारे उपस्थित होते. खासगी कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रामया हिरेमठ हे महाराष्ट्र राज्य पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या पिंपरी विधानसभा विभागाचे सचिव आहेत.
विश्वजित खुळे म्हणाले, प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. त्यामुळे चांगुलपणा टिकून आहे. अशा प्रामाणिक व्यक्तींकडून पोलिसांना नेहमीच सहकार्य होते. समाजाने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे. रामया हिरेमठ म्हणाले, आपण सतर्क आणि सजग राहिले पाहिजे. तसेच प्रामाणिकपणा जपला पाहिजे. त्यामुळे पोलिसांचा ताण कमी होण्यास मदत होईल.