पिंपरी : महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात दोन वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. नियमित पाणी पुरवठ्यासाठी शहराला आणखी ७६० एमएलडी पाणी मुळशी धरणातून मिळावे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी आरक्षित करावे, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्यातून सुटका होणार आहे.
देशातील सार्वधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड शहर आहे. गेल्या तीस वर्षात पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे आहे. मागील २५ वर्षांतील लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता सन २०३१ मध्ये शहराची लोकसंख्या ५२ लाख आणि २०४१ मध्ये ९६ लाख अपेक्षित धरली आहे. पाण्याबाबत आजपर्यंत योग्य नियोजन न केल्याने आणि पवना बंदीस्त जलवाहिनीस खो बसल्याने पाणीसंकट वाढले आहे.
पाणी पडतेय अपुरे-
शहरासाठी सध्या मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. तसेच आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून सध्या ७७७ एमएलडी पाणी आरक्षित केले केले आहे. आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पवना व आंद्रा प्रकल्पाचे पाणी सध्या महापालिका घेत आहे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी वाढणार आहे. सन २०४१ च्या संभाव्य ९६ लाख लोकसंख्येसाठी १ हजार ५३६ एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. सद्यस्थितीत ७७७ एमएलडी पाणी शहरासाठी आरक्षित आहे. उर्वरित पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याचे नवे स्त्रोत महापालिकेस निर्माण करावे लागणार आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेने मुळशी धरणात ७६० एमएलडी पाणी आरक्षित करण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. त्यातील ९८.५० टक्के पाणी घरगुती पिण्यासाठी वापरले जाईल. तर, १. ५० टक्के पाणी औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी वापरले जाईल. त्यासाठी शासन निर्णयानुसार पुनर्स्थापना खर्च महापालिका भरण्यास तयार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरासाठी सुमारे साडेसातशे एमएलडी पाणी आरक्षण मंजुर करावे, असे पत्र महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्यांना पाठविले आहे.